


पारोळा : प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३वर मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास विचखेडे ते कळजी दरम्यान पुढे चालत असलेल्या कंटेनरला बस चालकाने मागून धडक दिल्याने बसमधील ९ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकहून मालेगाव-धुळे बायपासमार्गे जळगाव जाणारी एसटी बस (एचएच२०/२५७९) ही पारोळा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३वर विचखेडे ते कळजीदरम्यान जात असताना वळणाजवळ समोर असलेल्या कंटेनरने अचानक ब्रेक मारल्याने व पावसामुळे कंटेनरची गती लक्षात न आल्याने बसने कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. जखमींना रुग्णवाहिका चालक आशुतोष शेलार यांनी घटनास्थळावरून रुग्णांना पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल केले.
बस चालक विनोद विक्रम सैंदाणे (जळगाव), वाहक राहुल दिगंबर पाटील (जळगाव) हे जखमी झाले. या दोघांसह बसमधील प्रवासी शेख मोहम्मद इलियाज (एरंडोल), शहिस्ता इलियाज शेख (एरंडोल), श्रावण मुरलीधर माळी (पारोळा), शेख असिफ शेख नजीम (कासोदा), शेख हरून रशीद शेख मुनीर (जळगाव), रितेश देवेंद्र भामरे (मेहरगाव, ता. जि. धुळे), रूपाली मोतीलाल पाटील (नगाव, ता. अमळनेर) हेदेखील जखमी झाले आहेत. यावेळी रुग्णांवर डॉ. गिरीश जोशी, डॉ. महेश पवार, डॉ. चेतन करोडपती, डॉ. पुरुषोत्तम पाटील, डॉ. मिलिंद श्राप आदींनी उपचार केले. पोनि अशोक पवार, पोउनि योगेश महाजन, विजय बोंदे, योगेश महाजन, अभिजीत पाटील, प्रवीण पाटील, संतोष महाजन, भूषण पाटील, आकाश पाटील यांनी वाहतूक सुरळीत केली.


