


मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. याच मुद्याला धरून बच्चू कडू यांच्या नेतृत्वात महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला हजारो शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला असून, या आंदोलनासाठी ट्रॅक्टर घेऊन शेतकरी बांधव नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत.
दुसरीकडे बच्चू कडूंच्या आंदोलनाची सरकारने गंभीर दखल घेतली असून, आज सकाळी साडेदहा वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. मात्र, या बैठकीला आपण उपस्थित राहणार नाही. यापूर्वीही सरकारने बैठका घेतल्या, पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. जोपर्यंत कर्जमाफीचा ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत नागपूर सोडणार नाही, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
पुढे बच्चू कडू यांनी म्हंटले की, “सरकारने याआधी ही बैठका घेतल्या, पण त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. मुख्यमंत्र्यांना जर शेतकऱ्यांची काळजी असेल तर त्यांनी चर्चा करून प्रतिनिधी पाठवावे. मी आंदोलन सोडून जाऊ शकत नाही. मी जर गेलो तर इकडे गोंधळ उडेल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि त्याचं खापर माझ्यावर फोडल्या जाईल. त्यामुळे सरकारने मागण्या पूर्ण कराव्या, अन्यथा मी नागपूर सोडणार नाही,” असा निर्धार बच्चू कडू यांनी केला आहे.
दरम्यान, बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वीही राज्यात आंदोलनं झाले आहेत. त्यातच आता बेलोरा ते नागपूर असा 182 किलोमीटरचा प्रवास करून शेतकरी आपल्या मागण्या सरकारपुढे मांडणार आहेत. बच्चू कडू यांचा महा एल्गार मोर्चा आज अमरावतीहून नागपूरमध्ये दाखल होणार आहे. महाएल्गार आंदोलनाला राज्यातील प्रमुख शेतकरी नेत्यांचा पाठींबा मिळाला असल्याने याप्रकरणी आता राज्य सरकार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


