


मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरे यांचे मानसिक संतुलन ढासळत आहे. त्याच मानसिक अवस्थेत ते बरळत असून इतरांना ॲनाकोंडा म्हणणारे उद्धव ठाकरे हे घरात बसलेले अजगर आहेत, अशा शब्दात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला आहे.
बावनकुळे म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देशभर फिरून संघटन उभे करतात. राजकारणाला गती देतात. इतकेच नाहीतर 370 कलम रद्द करून इतिहास रचतात. पण उद्धव ठाकरे घरात बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाह यांच्यावर टीका करतात.
या अजगराने स्वतःच्या पक्षालाच गिळून टाकलं, आपल्या सैनिकांना गिळलं,वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वावादी विचारांना गिळलं. 25 वर्षे मुंबई गिळंकृत केली. तो अजगर आज इतरांना दोष देत आहे.
उद्धव ठाकरे यांनी अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका केली आहे. तो नीच स्तर आम्ही गाठू शकत नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा पराभव होणार असल्याचे त्यांना चांगले ठाऊक असल्याने आता स्वतःचे अस्तित्व दाखविण्यासाठी ते अशी विवेकभ्रष्ट टीका करीत आहेत.
उद्धव ठाकरे यांना मी एवढेच सांगू इच्छितो की, तुमच्या या विकृत राजकारणाला खुद्द तुमचा कार्यकर्ता कंटाळला आहे. एकवेळ अशी येईल की, मागे वळून बघाल तेव्हा तुमच्यासोबत कुणीही राहणार नाही, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली.


