


जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील चोरट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्या ‘मुक्ताई’ बंगल्यात चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, राजकीय नेत्यांची घरेसुद्धा सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवराम नगर येथील ‘मुक्ताई’ बंगल्यात ही चोरी घडली आहे. एकनाथ खडसे हे बहुतांशी मुक्ताईनगर येथे वास्तव्यास असल्याने जळगावमधील बंगला बंद होता. आज सकाळी नेहमीप्रमाणे खडसे यांचे कर्मचारी बंगल्यावर आले असता त्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले पाहिले. घरात प्रवेश करून पाहणी केली असता, आतील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकलेले आढळले, ज्यामुळे घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती तात्काळ एकनाथ खडसे यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवून घटनास्थळी बोलावले. माहिती मिळताच पोलीस ताफा मुक्ताई बंगल्यावर दाखल झाला असून, सध्या पंचनामा व तपासाचे काम सुरू आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
या चोरीत नेमके किती नुकसान झाले आहे आणि कोणत्या वस्तू चोरीस गेल्या आहेत, याची अचूक माहिती पोलीस तपासानंतरच समोर येणार आहे. मात्र, एका वरिष्ठ राजकीय नेत्याच्या निवासस्थानी चोरी होणे हे शहराच्या कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करते.


