


चोपडा : प्रतिनिधी
शहरा बाहेरील शिरपूर बायपासजवळील रणगाडा चौकात मध्यरात्री सुमारे २:३० वाजेच्या सुमारास रस्ता लुटीच्या तयारीत असलेल्या सात सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिलीपसिंग हरिसिंग पवार (३६, नांदेड), विक्रम बाळासाहेब बोरगे (२४, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर), अनिकेत बालाजी सूर्यवंशी (२५, नांदेड), अमनदीपसिंग अवतारसिंग राठोड (२५, नांदेड), सद्दाम हुसेन मोहम्मद अमीन (३३, नांदेड), अक्षय रवींद्र महाले (३०, भावसार गल्ली, चोपडा) आणि जयेश राजेंद्र महाजन (३०, भाट गल्ली, चोपडा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
या ठिकाणी चारचाकी वाहन संशयास्पदरीत्या उभे असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळाल्यावर त्यांनी तत्काळ पोलिस पथक पाठवून चौकशी केली. चौकशीदरम्यान, सात गुन्हेगारांना रस्ता लुटीच्या तयारीत असताना अटक करण्यात आली. दि. २७ रोजी मध्यरात्री २:३० वाजता चोपडा-शिरपूर बायपासवर एक वाहन थांबले असून, त्यातील इसम संशयास्पद असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तत्काळ पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना बघताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र, पोलिसांनी घेराव घालून त्यांना जेरबंद केले. झडतीदरम्यान, दोघांच्या कमरेवर गावठी कट्टे आढळून आले.
या आरोपींवर नांदेड, वैजापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) तसेच चोपडा पोलिसांत खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, रस्ता लूट, दंगल, दहशत माजवणे आणि हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी दोन आरोपी नुकतेच मकोका (एमपीडीए) गुन्ह्यातून बऱ्याच अडचणींतून बाहेर आले आहेत. त्यांच्याजवळील चार चाकी वाहनाची तपासणी केली असता त्यातून दोन तलवारी आणि रिकामी मॅगझीन मिळाली. याप्रकरणी त्यांच्याकडून चारचाकी वाहन, मोबाइल, दोन गावठी कट्टे, दोन तलवारी आणि रोख रक्कम यासह एकूण १३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स.पो.नि. एकनाथ भिसे, पोलिस हर्षल पाटील, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, अमोल पवार, मदन पावरा, रवींद्र मेढे यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.


