मुंबई : वृत्तसंस्था
मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागांसह उत्तर महाराष्ट्र, कोकणातील मुसळधार पावसामुळे राज्यातील बळीराजा कोलमडला आहे. या पावसाने हातातोंडाशी आलेल्या पिकांची नासाडी झाली आहे. यातच आता पुढील 2 ते 3 दिवस राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने विदर्भावर अवकाळीचे ढग जमा झाले आहेत. हे सावट पुढचे चार-पाच दिवस राहणार असल्याचा अंदाज आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणासह राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आणखी दोन दिवस राज्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अकोला जिल्ह्यात पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीनसह कपाशी पिकांना या पावसाचा फटका बसला आहे. रविवारी सायंकाळीसुद्धा अकोला शहर व परिसरात पावसाच्या सरी आल्या. या पावसामुळे कपाशी आणि सोयाबीन पिकांना फटका बसला. पावसामुळे काढणी करून ठेवलेले सोयाबीन भिजले. याशिवाय कांदा, सोयाबीन, वेचणीवर आलेला कापूस, मका, टोमॅटो, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले असून, रायगडमधील भातकापणी ठप्प झाली आहे. तर पुण्यात भातशेती पाण्याखाली गेली आहे.


