नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील नागपूरमध्ये सतराव्या रोजगार मेळाव्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमादरम्यानचा दोन महिला अधिकाऱ्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावेळी भारतीय टपाल सेवेतील दोन महिला अधिकारी पंतप्रधान मोदी आणि गडकरींसमोर या कार्यक्रमात एकमेकींसोबत भिडल्या. मात्र कशावरून? तर केवळ एका खुर्चीवरून…
नागपूरमध्ये १७ व्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधान मोदींनी ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरी पत्रे वाटली. या कार्यक्रमाला गडकरी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांच्या बाजूला असलेल्या सोप्यावर टपाल सेवेतील दोन महिला अधिकारी बसलेल्या होत्या. मात्र, या सोप्यावर केवळ एकच अधिकारी बसण्याची व्यवस्था होती. त्यांच्या नावाची पाटीही टेबलवर ठेवण्यात आली होती.
मात्र, टपाल सेवेतील एका महिला अधिकारी यांची बदली दक्षिण भारतातील एक शहरात झाली. मात्र, अद्यापही त्यांनी मुख्यालय सोडलेले नाही. त्यांच्या ठिकाणी दुसऱ्या एक महिला अधिकारी रूजू झाल्या आहेत. मात्र, रोजगार मेळाव्यामध्ये या दोन्ही महिला अधिकारी उपस्थित होत्या. यावेळी एकाच खर्चीवर दोघीही बसल्या. त्यावेळी दोघीही एकमेकींना धक्के मारून त्या खर्चीवरून उठवत होत्या.
हा सर्व प्रकार व्यासपीठावर केंद्रीय मंत्र्यांच्या समोरच झाला. या संपूर्ण प्रकाराकडे पाहून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काहीसे वैतागले. त्यांनी तात्काळ आपल्या सहकाऱ्यांना सूचित करून परिस्थिती आटोक्यात आणली. कार्यक्रम काही क्षण थांबवावा लागला. नंतर दोन्ही अधिकाऱ्यांना व्यासपीठावरून हटवण्यात आले आणि कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला. मात्र सार्वजनिक कार्यक्रमात घडलेल्या या घटनेमुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.


