मुंबई : वृत्तसंस्था
स्थानिक निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून, केंद्र आणि राज्याच्या धर्तीवर देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेत वर्चस्व प्रस्थापित करण्याचे ‘मिशन १५० प्लस’ चे लक्ष्य ठेवले आहे. युतीमधील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून, भाजप १५० हून अधिक जागांवर उमेदवार उतरवण्याची तयारी करत असल्याचे सूत्रांकडून कळते. यावरूनच शिवसेना उद्धाव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी भाजपला उपरोधिक टोला हाणला आहे. त्याचबरोबर त्यांनी भाजप काहीही म्हणत असलं तरी मुंबई महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसणार असं सांगितलं.
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने १५० जागांचे लक्ष्य ठेवले असले तरी, जागावाटपात मित्रपक्ष असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला (शिवसेना) ६५ ते ७५ जागा देण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे. यानुसार, उर्वरित सुमारे १५० जागांवर भाजप स्वतःचे उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहे. या जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही, परंतु दोन्ही पक्षांमध्ये यावर सहमती होण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेतील यंदाचे राजकीय गणित विशेषतः मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य राजकीय समीकरणावरही अवलंबून असणार आहे. ठाकरे बंधूंनी एकत्र निवडणूक लढवल्यास, भाजप-शिंदे युतीसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते, अशी राजकीय जाणकारांची मतं आहेत.
दरम्यान, भाजपच्या ‘१५० प्लस’च्या घोषणेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी उपरोधिक शैलीत जोरदार टीका केली आहे. भाजपच्या आत्मविश्वासावर उपरोधिकपणे राऊत म्हणाले, ‘मला असं वाटतं त्यांचा जो आत्मविश्वास आहे, तो पाहता भारतीय जनता पक्ष १५० प्लसचा नारा देईल. एकनाथ शिंदे गट १२० चा नारा देईल आणि अजित पवार किमान १०० जागा मुंबईत जिंकतील असे एकंदरीत त्यांचा आत्मविश्वास दिसतो आणि मग आम्हाला सगळ्यांना राजकारणातून संन्यास घेऊन ‘हरी हरी’ करत केदारनाथला जावं लागेल, पंतप्रधान मोदींची गुंफा आहे तिथे आम्हाला जाऊन बसावं लागेल.’


