प्रतिनिधी गौरव पाटील: जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथून घरासमोर उभी ५० हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबविल्याची घटना रविवार, २६ जून रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास समोर आली होती. याबाबत एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरीला गेलेली दुचाकी धरणगाव शहरापासून स्मशानभूमीजवळ आढळून आली असून पोलीसात जमा केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथे अरुण काशीदास जगताप (वय-५३) हे वास्तव्यास आहेत. ते शेती करतात. अरुण जगताप यांचा मुलगा उमाकांत याच्याकडे दुचाकी आहे. नेहमीप्रमाणे त्याने त्याची एम.एच.१२ टी.जी. २६३० या क्रमाकांची दुचाकी घरासमोर उभी केली होती. रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घरासमोर उभी दुचाकी आढळून आली नाही. याबाबत रविवारी २६ जून रोजी सकाळी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, धरणगाव शहरातील विवरे रस्त्यावर असलेल्या स्मशानभूमीजवळील काटेरी झुडपाच्या आडोश्याला ही दुचाकी बेवारस स्थीतीत धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक कुशाल पाटील, समाधान भागवत यांना मिळाली. दुचाकी ही धरणगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आली. दरम्यान, जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील ही दुचाकी असल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत धरणागाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूल खताळ यांनी दुचाकी जप्त केली असून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांचा शोध घेणे सुरू आहे.