मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप करत विरोधकांनी निवडणूक आयोगासह भाजपवर हल्लाबोल केला आहे. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे. इतकेच काय तर, विरोधकांवर बॉम्ब टाकणार असून लोकसभा निवडणूक काळात त्यांना ज्या मतदारसंघात लाभ झाला तेथील मतदारयाद्यांतील घोळ पुराव्यांसह जनतेसमोर आणू, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
“निवडणुका आताच घेतल्या तर पराजयाला सामोरे जावे लागेल अशी शंका विरोधकांना वाटत आहे. त्यांना निवडणुका अडचणीच्या वाटत आहेत. त्यामुळे सहा महिने निवडणुका पुढे गेल्या तर बरे होईल, असे त्यांचे मत आहे. म्हणून मतदार याद्यांचे कारण पुढे केले जात आहे. मतदार याद्यांत सुधारणा व्हावी ही माझीही भूमिका आहे. त्यासाठी याआधीच मी निवडणूक आयोगाकडे गेलो आहे,” असे फडणवीसांनी सांगितले.
“ज्यावेळी प्रारूप याद्या येतात त्यावेळी निवडणूक आयोगाकडून त्या अंतिम करण्यापूर्वी हरकती व सूचना मागविल्या जातात. त्यावेळीच त्यांनी निवडणूक आयोगाला हरकती,सचूना नोंदवून का विचारले नाही, असा सवाल फडणवीस यांनी केला. त्यामुळे विरोधक मतदारयाद्यांबाबत जो कांगावा करत आहेत तो निरर्थक असल्याचेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांतील युतीबाबतही भूमिका स्पष्ट केली. “ज्या ठिकाणी तिघांचीही ताकद आहे. त्या ठिकाणी एकत्र लढून काहीही उपयोग होणार नाही. त्या ठिकाणी स्वतंत्रच लढणार. मात्र मुंबई महापालिकेची निवडणूक आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. या ठिकाणी १०० हून अधिक जागा मिळतील व बहुमताचा आकडा आम्ही निश्चित पार करू, महापौर महायुतीचाच बसेल, “असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तर नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेत स्वतंत्र निवडणूक लढवू. निवडणुकीनंतर मात्र आम्ही युती करू कोणत्याही परिस्थितीत विरोधकांना फायदा होऊ देणार नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.


