मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेना पक्ष व चिन्हाप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत अंतिम निकाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने येण्याची शक्यता अगदी शून्य आहे. कायदेशीर व घटनात्मक पद्धतीने निकाल लागणार असेल तर तो उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने लागेल, असा ठाम दावा विधिज्ञ असीम सरोदे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे सत्ताधारी शिवसेनेत एकच खळबळ माजली आहे. सद्यस्थितीत वारंवार तारीख देण्याची प्रक्रिया अतिशय वाईट पातळीला पोहोचली आहे. न्यायाला विलंब होणे हा ही एकप्रकारचा अन्यायच आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
शिवसेना पक्ष चिन्ह व नावाची सुनावणी सुप्रीम कोर्टात 12 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या सुनावणीकडे महाराष्ट्रासह अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंडाळी केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने संख्याबळाच्या धारावर शिवसेना पक्ष व चिन्ह हे एकनाथ शिंदेंना सोपवले. त्यानंतर आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठापुढे अंतिम सुनावणीसाठी आले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी या खटल्याच्या संभाव्य निकालावर भाष्य केले आहे.
ते ‘साम टीव्ही’शी बोलताना म्हणाले, सध्या वारंवार तारीख देण्याची प्रक्रिया अतिशय वाईट पातळीला पोहोचली आहे. न्यायाला विलंब होणे हा अन्यायच आहे. तारीख देण्याच्या माध्यमातून अन्याय होत असेल, अन्यायाला खतपाणी मिळत असेल तर हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे. उद्धव ठाकरे यांची बाजू घटनात्मक पातळीवर अत्यंत मजबूत आहे. त्यांच्या विरोधात निकाल देताच येणार नाही. त्यामुळे कोर्टाने या प्रकरणी जो काही निर्णय असेल तो लवकरात लवकर द्यावा अशी माझी मागणी आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल लागला तर काय? हा प्रश्न काल्पनिक आहे. कारण, त्यांच्या बाजूने निकाल लागणारच नाही. हे माझेच नव्हे तर ज्यांना कायदा कळतो, संविधान कळते ते कुणीही हे सांगतील. एकनाथ शिंदे यांचा प्रवाह ज्यांना कळला हे त्यांनाही माहिती आहे. शिंदेंनी पक्ष चोरला आहे. निष्ठा विकली आहे. त्यांनी संविधानाची मोडतोड करून अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदही भोगले आहे. त्यामुळे त्यांच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता शून्य आहे. कायदेशीर व घटनात्मक पद्धतीने निकाल लागणार असेल, तर तो उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने लागेल, असे असीम सरोदे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही तोंडावर आहेत. त्यामुळे न्यायालयाने आपला निकाल तत्काळ दिला पाहिजे. विशेषतः एकनाथ शिंदे यांनी स्वतः कोर्टात जाऊन या प्रकरणाचा त्वरित निकाल देण्याची मागणी केली पाहिजे. या प्रकरणाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर धनुष्यबाण विरहित निवडणुका एकनाथ शिंदेंनी जिंकून दाखवाव्यात.
असीम सरोदे यांना यावेळी संभाव्य निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर एकनाथ शिंदे यांचे भविष्य काय असेल? ते भाजपच्या गोटात जातील का? असा प्रश्न करण्यात आला. त्यावर ते म्हणाले, एकनाथ शिंदे हे आत्ताच भाजपत दाखल झाले आहेत. शिवसेनेतील फूट राजकीय कारणासाठी वापरण्यासाठी त्यांचे अस्तित्व कायम ठेवण्यात आले आहे. शिंदेंच्या विरोधात निकाल लागला तर भाजप शिंदे व त्यांच्या काही लोकांना लगेचच आपल्या पक्षात घेईल. उद्धट, अर्वाच्च बोलणारे विशेषतः ज्यांचे राजकीय चेहरे विद्रुप आहेत अशा लोकांना भाजप आपल्या पक्षात घेणार नाही. त्यानंतर एक मोठी राजकीय उलाढाल महाराष्ट्राच्या राजकारणात होताना आपल्याला दिसून येईल, असे सरोदे या प्रकरणी बोलताना म्हणाले.


