जळगाव प्रतिनिधी । विधानसभेच्या बैठकीला गैरहजर बंडखोर आमदारांना अपात्रते संदर्भात नोटीस पाठवण्यात आली आहे. यात चोपड्याच्या आमदार लताबाई सोनवणे यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर यांच्यासोबत अनेक आमदार गेले आहेत. यात जळगाव जिल्ह्यातील ५ आमदारांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यातील बंडखोर पाच आमदारांपैकी चोपड्याचे आमदार लताबाई सोनवणे यांनाही यासंदर्भात नोटीस पाठवण्यात आले आहे. लताबाई सोनवणे यांच्या जळगावच्या निवासस्थानी गेटवर शनिवारी २५ जून रोजी रात्री १०.३० वाजेनंतर ही नोटीस लटविण्यात आली होती. आज सकाळी नोटीस लताबाई सोनवणे यांच्या कुटुंबियांना प्राप्त झाली आहेत. नोटीसवर महाराष्ट्र विधानसभा मंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव यांची स्वाक्षरी आहे.
आमदार लताबाई सोनवणे यांचे पती माजी आ. चंद्रकांत सोनवणे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आज सकाळी रविवार २६ जून रोजी नोटीस मिळाली व त्यावर तत्काळ दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी २७ जून रोजी लेखी अभिप्राय करणेबाबत कळविण्यात आले आहे. दरम्यान बंडू खरे पारोळा येथील आमदार चिमणराव पाटील यांना ही नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.