भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील कृष्णानगर परिसरात किरकोळ कारणावरून महिलेला मारहाण करून चाकूने जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रेखा धनराज बोरोले (वय ३३, व्यवसाय – गृहिणी, रा. कृष्णानगर, भिरूड हॉस्पिटलजवळ, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. रेखा बोरोले या पती धनराज बोरोले, दोन मुले व सासूसह राहतात. १८ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांचा मोठा मुलगा तुषार हा गल्लीमध्ये फटाके फोडण्यासाठी गेला होता.
सुभाष सोनवणे यांचे फटाक्यांचे दुकान असून तेथे भांडण सुरू होते. भांडणाचा आवाज ऐकून रेखा बोरोले बाहेर आल्या. तेवढ्यात आजादसिंग श्रावणसिंग भाटिया याने रेखा यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. कारण विचारल्यावर तो म्हणाला, ‘तुझ्या नवऱ्याने मला दारू दिली नाही म्हणून शिवीगाळ करतो.’ असे म्हणत त्याने रेखा यांना सिमेंट मशीनजवळून धारदार वस्तू आणून त्यांच्यावर वार केला. या हल्ल्यात रेखा बोरोले जखमी झाल्या आहेत.


