जळगाव : प्रतिनिधी
पिंप्राळा हुडको परिसरात १५ ऑक्टोबर रोजी गाणे लावण्यावरून झालेल्या वादातून दोन गटात हाणामारी होऊन एकमेकांना लाठ्याकाठ्या, सळईने मारहाण करण्यात आली. तसेच घरात घुसून साहित्याची नासधूस केली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून रामानंद नगर पोलिसात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
यासंदर्भात अनिता किरण ढिवरे (३०, रा. पिंप्राळा हुडको) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गाणे लावण्यावरून विचारणा करीत सहा जणांनी अनिता ढिवरे यांच्यासह त्यांचे दीर जितू ढिवरे यांना लोखंडी सळईने मारहाण केली. तसेच घरात घुसून साहित्याचे नुकसान केले. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी फिर्याद किरण सपकाळे यांनी दिली असून, त्यात म्हटले आहे की, त्यांना उद्देशून आम्ही कोणतेही गाणे लावू, तू आम्हाला बोलणारा कोण, असे म्हणत दोन जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


