जळगाव : प्रतिनिधी
महिला स्वावलंबी होऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात, यासाठी शासन सतत प्रयत्नशील आहे. बचतगटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण हे शासनाचे प्राधान्य असून, ग्रामीण व शहरी भागातील महिलांना रोजगार आणि त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत दिवाळी निमित्त आयोजित केलेल्या बचतगटांच्या विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलचे उद्घाटन जीएस ग्राउंड, जळगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे उपस्थित होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना उत्तम बाजारपेठ मिळावी या उद्देशाने ‘बहिणाबाई मॉल’ सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे जळगाव जिल्ह्यात महिला स्वावलंबनाचे एक यशस्वी मॉडेल निर्माण झाले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अशा ‘बचतगट मॉल ची उभारणी करण्यात येत असून, महिलांना त्यांच्या उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून दिल्यास त्या अधिक सक्षम, स्वावलंबी आणि उद्योजक बनतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.