मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुती काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी स्वतंत्र लढणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाष्य केले आहे.
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढायच्या की महायुतीच्या स्वरूपात, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. निवडणुकांचे वातावरण निर्माण झाले असून दिवाळीनंतर कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होऊ शकते. निवडणूक स्वबळावर लढायच्या की महायुतीतून याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. कार्यकर्त्यांची इच्छा, भावना आणि संघटनात्मक तयारी यांचा विचार करून निर्णय घेतला जाईल,” रवींद्र चव्हाण यांनी सांगितले आहे.
पुढे ते म्हणाले की, “पक्षांतर्गत संघटनात्मक बैठका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये घेतली होती. त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक रचनेची बैठक बोलवली होती. या बैठकीत उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले आहे. कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे, त्यामुळे सर्वांना संधी मिळावी यासाठी स्थानिक पातळीवर काही ठिकाणी एकत्रित लढणार असलो तरी स्वबळाचाच कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याने त्यानुसारच निवडणूक लढवली जाणार आहे. भाजप हा शिस्तप्रिय पक्ष असून नेते जसा आदेश देतील तो प्रत्येक कार्यकर्ता पाळत असतो,” असेही रवींद्र चव्हाण यांनी म्हटले.
विरोधकांकडून बोगस मतदानाबाबत नरेटिव्ह पसरवला जातोय
सध्या देशात बोगस मतदानाबाबत विरोधकांकडून आरोप केले जात आहेत. त्यावर बोलतांना चव्हाण म्हणाले की, “मतदार यादी या चांगल्या असाव्या याबाबत प्रत्येक पक्ष बोलत असतो. मतदार नोंदणीची प्रक्रिया असते यासाठी निवडणूक आयोग कार्यक्रमाही देत असतो. त्यासाठी वेळही दिला जातो. या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला माहिती असतात. मात्र, विरोधकांकडून मतदार यादीबाबत फेक नरेटिव्ह पसरविण्यात येत आहे. निवडणूक आयोगाकडे सर्व अधिकार असून, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखली जाईल,” असेही रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.


