जळगाव : प्रतिनिधी
जेवण केल्यानंतर झोपण्यासाठी खोलीत गेलेल्या प्रकाश गायकवाड (वय ४२, रा. कुसुंबा, ता. जळगाव) यांनी झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना दि. १५ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. वडीलांनी गळफास घेतल्याचे दिसताच मुलाने मनहेलावणारा आक्रोश केला. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे राहणारे प्रकाश गायकवाड हे एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत कामाला होते. दि. १५ रोजी रात्री त्यांनी रात्री ८ वाजता जेवण केले आणि त्यानंतर ते आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले. रात्री १० वाजता त्यांचा मोठा मुलगा राहुल वडिलांच्या खोलीत गेला असता, त्यांना वडील तिथे दिसले नाहीत. त्याने घराच्या मागे पाहिले असता, त्याचे वडील प्रकाश गायकवाड हे निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. मुलाने तातडीने आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूच्या ग्रामस्थांनी धाव घेतली.
ग्रामस्थांनी तातडीने प्रकाश गायकवाड यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, तेथे उपस्थित डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. घटनेच्या वेळी प्रकाश गायकवाड यांच्या पत्न छाया गायकवाड या माहेरी गेल्या होत्या, तर त्यांचा लहान मुलगा कामासाठी हॉटेलवर गेला होता. त्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. प्रकाश गायकवाड यांनी नेमकी कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.