मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मनसेचे माजी नेते आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तीन वेळा पुढे ढकलला गेलेला हा पक्षप्रवेश आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. कोकणात भाजपची पकड मजबूत करण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून खेडेकरांचा हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
मनसेतील राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे खेडेकर यांची अलीकडेच भाजप आणि शिंदे गटाशी जवळीक वाढली होती. यामुळे मनसेने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर खेडेकरांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला, पण तो रखडत गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. “भाजप खेडेकरांना झुलवत आहे का?” असा प्रश्न उपस्थित झाला होता. अखेर, रवींद्र चव्हाण आणि प्रवीण दरेकर यांच्याशी चर्चेनंतर खेडेकरांचा पक्षप्रवेश निश्चित झाला.
भाजप प्रवेशानंतर खेडेकर म्हणाले, “पक्षप्रवेश का रखडला हे एका वाक्यात सांगता येणार नाही. माझ्या मुलाखतीत मी सविस्तर सांगेन. मनसेसोबत भावनिक नाते होते, पण दुरावा निर्माण झाल्याने दुःख आहे. आता भाजपमध्ये जोमाने काम करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देणार.” कोकणात भाजपची ताकद वाढवण्यासाठी हा प्रवेश महत्त्वाचा ठरणार आहे.
दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरे गटाला उत्तर महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या राज्य संघटक ॲड. ललिता शाम पाटील आणि अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक पराग पाटील यांनी कार्यकर्त्यांसह ठाकरे गट सोडला. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. हा प्रवेश मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात पार पडला.


