धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील फेसर्डी येथील जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
“समाज सेवा हीच खऱ्या अर्थाने ईश्वर सेवा !” अशी समाजाला शिकवण देणाऱ्या परम पूज्य श्री सत्य साईबाबांच्या प्रेरणेने व कृपाशीर्वादाने धरणगाव येथील नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, मा.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे स्वीय सहायक श्रीमती मंजिरी त्रिवेदी तसेच जिल्हा न्यायालयातील कार्यरत कर्मचारी श्री. बी. जी.नाईक यांच्या आर्थिक योगदानातून हा कार्यक्रम राबविण्यात आला.
सर्व विद्यार्थ्यांना दप्तर, पाटी, वह्या, कंपास कीट, वॉटर बॉटल, लंच बॉक्स या शैक्षणिक साहित्याचे आणि अंगणवाडीतील सर्व बालकांना बिस्किटाचे मोफत वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम रविवारी २६ जून रोजी सकाळ ९.३० वाजता घेण्यात आला.
याप्रसंगी मोहन त्रिवेदी, जळगांव जनता बँकेचे डेप्युटी मॅनेजर अरविंद परमार, शाळेचे शिक्षक नाना ठेलारी, किशोर पाटील, अंगणवाडी सेविका अलका पाटील यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास शिक्षण विस्तार अधिकारी श्री. पठाण यांचे मार्गदर्शन लाभले. सदरील कार्यक्रमास पालकांची आणि गावकऱ्यांची देखील उपस्थिती होती.