मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात वाढलेल्या भेटीगाठींमुळे राज्याच्या राजकारणात मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांना अधिक वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्याचे उद्योगमंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी राज ठाकरे यांना थेट सल्लाच दिला आहे. युतीचा निर्णय घेण्यापूर्वी राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलच्या भूमिकेचा नक्कीच विचार करावा, असे उदय सामंत म्हणालेत.
‘काँग्रेस’ला सोबत घेण्याची इच्छा राज ठाकरे यांची इच्छा आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सोबत घेणे गरजेचे असल्याची राज यांची भूमिका असल्याचे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. याबाबत उदय सामंत यांना विचारले असता, त्यांनी राज ठाकरेंना उपरोक्त सल्ला दिला.
पत्रकारांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की, राज ठाकरे यांनी कोणत्याही युतीचा निर्णय घेण्यापूर्वी काँग्रेसच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीच्या भूमिकेचा गांभीर्याने विचार करावा. सावरकरांचा सातत्याने अपमान करणाऱ्या पक्षासोबत हातमिळवणी करणे हे हिंदुत्ववादी विचारांचे नेतृत्व करणाऱ्या राज ठाकरे यांना साजेसे ठरणार नाही.
उदय सामंत यांनी यावेळी काँग्रेसवर आणि काँग्रेसशासित कर्नाटक सरकारवरही तीव्र शब्दांत हल्ला चढवला. ते म्हणाले, कर्नाटकात सत्तेवर असलेल्या काँग्रेस सरकारकडून सीमाभागातील मराठी लोकांवर अन्याय होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसकडून हिंदुत्वाच्या मूल्यांना धक्का पोहोचतो. त्यामुळे हा पक्ष कोणालाच मानत नाही, एवढा तो स्वयंभू झालेला आहे.


