नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केरळच्या तिरुवनंतपुरम येथील एका 26 वर्षीय अभियंत्र्याने 9 ऑक्टोबर रोजी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. तत्पूर्वी, एका सुसाईड नोटमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरात झालेल्या लैंगिक शोषणामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपुत्र प्रियांक खरगे यांनी कर्नाटक सरकारकडे एका पत्राद्वारे संघावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी वरील शब्दांत ही मागणी धुडकावून लावली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कि , राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक सांस्कृतिक शक्ती व देशभक्त संघटना आहे. त्यामुळे या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांकडे आम्ही ढुंकूणही पाहत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी संघावर बंदी घालण्यासंबंधी काँग्रेसने केलेली मागणी धुडकावून लावली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, कर्नाटकचे नेते प्रियांक खरगे प्रसिद्धीसाठी असल्या गोष्टी करत असतात. त्यांना कोणताही आधार नाही. ते आपल्या वडिलांच्या भरवशावर राजकारण करणारे नेते आहेत. मी त्यांना एवढेच सांगू इच्छितो की, यापूर्वी अनेकदा संघावर बंदी घालण्याचा प्रयत्न झाला किंबहुना बंदीही घालण्यात आली. ज्या इंदिरा गांधींनी संघावर बंदी घातली, त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले. त्यामुळे संघ एक सांस्कृतिक शक्ती आहे. एक देशभक्त संघटना आहे. राष्ट्रीय विचारांनी प्रेरित मूल्याधिष्ठित अशा प्रकारच्या मानवनिर्मितीचे कार्य संघ करतो. त्यामुळे प्रसिद्धीसाठी पत्र लिहिणाऱ्यांकडे आम्ही ढुंकूणही पाहत नाही.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शक्य आहे तिथे महायुतीमधील मित्रपक्षांसोबत युती करण्याचे संकेत दिले. ते म्हणाले, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संपूर्ण महाराष्ट्रात विभागनिहाय आमचे दौरे लावलेत. राज्यात लवकरच महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी या बैठका लावण्यात आल्यात. आम्ही यापूर्वी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या 4 विभागांचा आढावा घेतला. आता अमरावती विभागाचा आढावा घेतला जात आहे. मुंबई विभागाचा आढावा पुढल्या आठवड्यात घेतला जाईल. एकूणच कार्यकर्त्यांची मानसिक तयारी चांगली आहे. निवडणुकीसाठी भाजप पूर्णपणे सज्ज आहे.


