भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील रेल्वे फिल्टर हाऊस मागील कवाडे नगर परिसरात कर्ज हप्त्याच्या वादातून एका तरुणास चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी १२ रोजी सकाळी दहा ते सव्वा दहा वाजेच्या सुमारास घडली.
कवाडे नगर येथील जगन्नाथ तायडे यांच्या घरी त्यांची मुलगी रत्नमाला शरद बाविस्कर व नातू प्रतीक शरद बाविस्कर हे बसलेले असताना, रेखा उर्फ छकुबाई दीपक म्यांद्रे हिने बँकेतील कर्ज हप्त्याबाबत वाद घालत कर्जाचे हप्ते भरा, असे सांगितल्याचा राग धरून आणखी चौघांना सोबत घेऊन प्रतीक व रत्नमाला बाविस्कर यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात प्रतीक बाविस्कर याला चाकूने भोसकून गंभीर जखमी करण्यात आले तर रत्नमाला बाविस्कर व त्यांच्या आईलाही मारहाण करून जखमी करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या सूचनेनुसार पोलिस कर्मचारी दीपक शेवरे, भूषण चौधरी, गजानन पाटील, जावेद तडवी, संदीप कजबे व शेखर तडवी यांनी घटनास्थळी धाव घेऊन कारवाई सुरू केली. पोलिस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, विभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात संबंधितांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित चौघांना ताब्यात घेतले आहे. याबाबतचा अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राहुल भंडारे करीत आहेत.


