वडीगोद्री : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणावरून मोठे वादंग सुरु असून नागपूर येथे ओबीसी मोर्चा काढण्यात आला होता. जो नेता छगन भुजबळ यांच्या आहारी जातो तो संपतो, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी नागपूर येथील ओबीसी मोर्चानंतर काँग्रेस नेते वडेट्टीवार यांच्यावर गुरुवारी (दि.९) केली.
माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, जोपर्यंत काँग्रेसचा सुपडा साफ होत नाही, तोपर्यंत ते गप्प बसणार नाहीत. छगन भुजबळ यांच्या षडयंत्रात विजय वडेट्टीवारसुद्धा गुंतले आहेत. चांगला माणूस होता, चांगला विरोधी पक्षनेता होता, चांगले काम करत होता, परंतु आता काँग्रेसचा सुपडासाफ करायला निघाला आहे.
जरांगे पाटील पुढे म्हणाले की, मराठा समाजाला ४८ टक्के आरक्षण आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवार यांना वेड लागलंय, कितीतरी जाती ओबीसीमध्ये आल्या त्यांना हे दिसत नाही का? त्यांच्या जागा कमी झाल्या. ज्या जाती ओबीसीमध्ये बसत नाही, त्या त्यांना चालतात. जो समाज मागासवर्गीय आयोगाचे निकष पूर्ण करत नाही तो समाजसुद्धा त्यांना ओबीसीमध्ये चालतो. त्यांचे दुखणे आणि द्वेष फक्त मराठा समाजाचा आहे. फक्त मराठ्यांना काही नाही मिळाले पाहिजे. त्यांच्या मनामध्ये मराठ्यांविषयी राग आणि द्वेष आहे. जे छगन भुजबळांच्या आहारी गेलेले लोक आहेत. परळीची एक लाभार्थी टोळी आजपासून त्याला किंमत द्यायची नाही, त्याची काय अवकात आहे, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर केली.


