मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा देखील केली जात आहे. मात्र ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, या मागण्या जोर धरत आहेत. सहकार मंत्री आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
चोपडा येथे दीपज बँकेच्या शाखा उद्घाटन कार्यक्रमात बोलताना बाबासाहेब पाटील यांनी ‘लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचं म्हणून निवडणुकीत काहीतरी आश्वासन देतो,’ असे विधान केले आहे. सध्या मराठवाड्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. राज्यभरातून शेतकऱ्यासाठी मदत पोहचली जात आहे. असे असताना सहकारमंत्र्यांनी केलेल्या या विधानानंतर त्यांच्यावर टिकेची झोड उठली आहे. या वाद निर्माण होण्यास सुरुवात झाल्यानंतर बाबासाहेब पाटील यांनी एका वृत्तवाहिनीसोबत संवाद साधत दिलगिरी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले होते बाबासाहेब पाटील?
“लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. निवडणुकीच्या काळात कोणी गावात नदी आणून द्या, अशी मागणी केल्यास निवडून यायचे असल्याने नदी आणून दिल्याचं आश्वासन दिले जाते. निवडणुकीत आम्हाला निवडून यायचंय म्हणून आम्हीही देखील आश्वासने देतो. या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला हवा,” असे बाबासाहेब पाटील यांनी म्हटले. त्यांच्या या विधानावरून सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी वर्गाची भावना दुखावली असून, विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.


