जळगाव : प्रतिनिधी
गैरसमजातून कृष्णा पांडुरंग सोनवणे (वय २८, रा. शिवाजी नगर नवीन घरकुल) याला संशयित कल्पेश देविदास शिंपी (रा. शिवाजीनगर) याने लोखंडी पट्टीने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. ८ रोजी दुपारच्या सुमारास शिवाजी नगरात घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शिवाजी नगर घरकुल परिसरात कृष्णा पांडुरंग सोनवणे हा तरुण वास्तव्यास आहे. दि. ८ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास संशयित कल्पेश शिंपी याने गैरसमजातून कृष्णा सोनवणे याच्यासोबत वाद घातला. त्यांच्यातील वाद वाढतच गेला. यावेळी कल्पेश शिंपी याने कृष्णा सोनवणे याला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याजवळील लोखंडी पट्टीने कृष्णावर वार करीत गंभीर जखमी केले. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर कृष्णा सोनवणे याने पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित कल्पेश देविदास शिंपी (रा. शिवाजीनगर, नवीन घरकुल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ बालाजी बारी हे करीत आहे.


