जळगाव : प्रतिनिधी
ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये आकर्षक नफ्याचे आमिष दाखवून एका ६१ वर्षीय व्यक्तीची तब्बल ५ लाख १४ हजार १०० रुपयांची फसवणूक केल्याची घटना बुधवार, ८ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली आहे. ‘वेल्थ इंडेक्स-के१३’ नावाच्या ग्रुपच्या माध्यमातून ही फसवणूक केली आहे. सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भागवत किसन पाटील (वय ६१, रा. गणेश पार्क, जळगाव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. दि. १४ ऑगस्टपासून फिर्यादी भागवत पाटील यांना ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्यासंदर्भात संपर्क साधण्यात आला.
आमिषाला बळी पडून फिर्यादी भागवत पाटील यांनी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्याने एकूण ५ लाख १४ हजार रुपये ऑनलाईन जमा केले. रक्कम स्वीकारल्यानंतर आरोपींनी फिर्यादीला कोणत्याही प्रकारची रक्कम परत केली नाही किंवा कोणताही परतावा दिला नाही. यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे पाटील यांच्या लक्षात आले. भागवत पाटील यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात बुधवारी संबंधित अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


