मुक्ताईनगर : वृत्तसंस्था
केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या रक्षा ऑटो फुएल्स या मुक्ताईनगरातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आला. यात दोन कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत मारहाण करीत तोडफोड करण्यात आली. जवळपास एक लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. ही थरारक घटना राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी रात्री १०:४५ वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश माळी व दीपक खोसे अशी मारहाण झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या पेट्रोल पंपावर दोन दुचाकीवर आलेल्या पाच जणांनी अचानक या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. कर्मचाऱ्यांच्या डोक्याला बंदूक लावत गल्ल्यातील आणि कर्मचाऱ्यांकडे असलेली जवळपास एक लाख रुपयांची रोकड लंपास केली. तसेच ऑफिसमधील संगणक, प्रिंटर, सीसीटीव्ही आणि विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी तपासासाठी पथके रवाना केली आहे.
मुक्ताईनगरातील हा पेट्रोलपंप अत्यंत रहदारीच्या मार्गावर आहे. या ठिकाणी नेहमी वाहनांची रात्री उशिरापर्यंत वर्दळ असते. अशात अचानक दरोड्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. दरोड्याची घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली, परंतु तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते. पोलिसांना दरोड्याची माहिती मिळताच त्यांनी पोलिस पथके खाना केल्याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ हे पथकासह घटनास्थळी पोहचले. दरोडेखोर बोहर्डी गावाच्या दिशेने पसार झाल्याची माहिती मिळताच पोलिस पथक त्या दिशेने रवाना झाले आहे. मागील आठ दिवसांत मुक्ताईनगरात चार ठिकाणी घरफोड्या झाल्या आहेत. यापैकी दोन घरफोड्या या दिवसा झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


