बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्या गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीच्या माध्यमातून चर्चेत येत असताना आता पुन्हा एकदा शेतीच्या वादातून एका महिलेचे पाय तोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची खळबळजनक घटना बीड जिल्ह्यातील अंजनवती गावात घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिथे तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. दरम्यान, अन्य एका घटनेत वकील राहुल आघाव यांनी बीड जिल्हा कारागृहात काही कैद्यांवर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. या घटनेमुळेही जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.
येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण खूपच गाजले. त्यानंतर महादेव मुंडे हत्या प्रकरणही उजेडात आली. या दोन्ही घटनांची पंचक्रोशीत चर्चा रंगली असताना आता शेतीच्या वादातून एका महिलेचे पाय तोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे.
या संबंधीच्या माहितीनुसार, नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंजनवती गावात ही घटना घडली आहे. येथील भावकीतील 4 जणांनी अश्विनी येडे नामक महिलेला निर्दयीपणे मारहाण केली. आरोपींनी या महिलेचे पाय तोडण्याचा प्रयत्न केला. त्यात सदर महिला गंभीर जखमी झाली. त्यांच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर बाब म्हणजे आरोपींनी महिलांवर हल्ला करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. त्यांनी यापूर्वी 3 महिलांवर असाच हल्ला केला होता. 3 महिन्यांपूर्वीच्या या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाला होता. त्यानंतर पुन्हा या आरोपींनी एका महिलेवरच हल्ला केल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. नेकनूर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पीडित कुटुंबाने आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांना गजाआड करण्याची मागणी केली आहे.


