नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेना आणि धनुष्यबाण पक्ष चिन्ह कोणाचे? यावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडली. यात सर्वोच्च न्यायालयाकडून पुन्हा एकदा पुढील तारीख देण्यात आली आहे. आता १२ नोव्हेंबर रोजी शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर सुनावणी होणार आहे.
सध्या शिवसेना नाव आणि चिन्ह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. याप्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात याबाबत आव्हान दिले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कालावधी जवळ येत असल्याने उद्धव ठाकरे यांनी जुलै महिन्यात अंतरिम अर्जाद्वारे पक्ष आणि चिन्ह वापरण्यावर तात्पुरते निर्बंध घालण्याची मागणी केली होती.
वकील असीम सरोदेंची पोस्ट
ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू मांडणारे वकील असीम सरोदे यांनी सुनावणी पार पडण्यापूर्वी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून पोस्ट करत एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वकील असीम सरोदे यांनी एक्सवर पोस्ट करत मोठा प्रश्न उपस्थित केला होता.
‘शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण जस्टीस सूर्यकांत यांच्या बेंचसमोर आज 16 नंबरला लागलेले असल्याने ते प्रकरण सुनावणीसाठी रिच होणार हे नक्की. परंतु एका इतर एका अर्धवट सुनावणी झालेल्या प्रकरणातील बेंचचे सुद्धा जस्टीस सूर्यकांत सदस्य न्यायाधीश आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणाची सुनावणी आज पूर्ण होईल का असे प्रश्नचिन्ह आहे. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यातर्फे असे प्रयत्न होतीलच की सुनावणी पुढे ढकलली जावी, असा आरोप असीम सरोदे यांनी यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला होता. अखेर त्यांची शंका खरी ठरली असून शिवसेनेचा निकाल पुन्हा लांबणीवर पडला आहे.
दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही महिन्यात पार पडतील. त्याआधीच खरी शिवसेना कुणाची हा निकाल सुप्रीम कोर्ट देणार आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे कायम राहणार की ते पुन्हा उद्धव ठाकरे यांना मिळणार हे आता सुप्रीम कोर्टाच्या पुढील निकालानंतर स्पष्ट होणार आहे.


