जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील कुसुंबा गावात चंद्रशेखर पाटील यांच्या घरावर दगडफेक करून गोळीबार केल्याच्या गंभीर घटनेतील पाच संशयित आरोपींना अटक केल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी त्यांची धिंड काढल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७वाजता ही कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये अटक केलेल्या आरोपींना सुप्रीम कॉलनी परिसरातून फिरवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील गणपती नगरात राहणारे चंद्रशेखर त्रंबक पाटील (वय-५५) यांच्या घरावर शनिवारी ४ ऑक्टोबर रोजी रात्री ७ ते ८ जणांनी हल्ला केला होता पाटील यांच्या मुलाच्या जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दुचाकीवरून आलेल्या या टोळक्याने प्रथम पाटील यांच्या घरावर दगडफेक केली आणि त्यानंतर त्यांच्याकडील गावठी पिस्तुलातून तीन वेळा अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली होती. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक बबन आव्हाड आणि त्यांच्या पथकाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. अवघ्या काही तासांतच पोलिसांनी या घटनेतील मुख्य पाच संशयित आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये गणेश उर्फ विकी ज्ञानेश्वर गोसावी, सचिन प्रभाकर सोनवणे, हर्षल रामचंद्र महाडिक, निखिल अनिल चव्हाण आणि रवी राठोड (सर्व राहणार सुप्रिम कॉलनी) यांचा समावेश आहे.
समाजात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांना जरब बसावा यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. सोमवारी सायंकाळी एमआयडीसी पोलिसांनी अटक केलेल्या या पाचही संशयित आरोपींची सुप्रीम कॉलनी परिसरातून धिंड काढली. कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलिसांचा कठोर संदेश देण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे


