जळगाव : प्रतिनिधी
मुलाला एका गुन्ह्यात अटक झाल्याच्या दोन दिवसांनंतर वडील आत्माराम प्रल्हाद सपकाळे (४५, रा.भोकर, ता. जळगाव) यांनी राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना ५ ऑक्टोबर रोजी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील भादली गावात झालेल्या एका घटनेप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दोन अल्पवयीन मुलांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून, यात भोकर येथील हर्षल आत्माराम सपकाळे (१८) याचाही समावेश आहे. त्याला ३ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आले होते. यानंतर, त्याचे वडील आत्माराम सपकाळे यांनी ५ ऑक्टोबर रोजी घराच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन गळफास घेतला. त्यांना जीएमसीत दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.


