जळगाव : प्रतिनिधी
विदेशी नागरिकांची आर्थिक फसवणूक करणारे बोगस कॉल सेंटर ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू होते, त्या तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. हद्दीत बोगस कॉल सेंटर सुरू असण्यासह कारवाईनंतरही संशयितांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्यामुळे ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सविस्तर वृत्त असे कि, नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे सांगून विविध देशातील नागरिकांना आमिष दाखवत आर्थिक फसवणूक करणाऱ्या मुमराबाद रस्त्यावरील बोगस कॉल सेंटरवर जळगाव पोलिसांनी कारवाई केली होती. हे कॉल सेंटर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू होते, तरीदेखील प्रभारींना याविषयी माहिती नव्हती. याशिवाय पोलिसांनी कारवाई केल्यानंतर अटक केलेले माजी महापौर ललित कोल्हे यांना पोलिस कोठडीत ठेवल्यानंतर तालुका पोलिस ठाण्यात व्हीआयपी सुविधा देण्यात आल्या होत्या. या सर्व प्रकाराची दखल घेत पोलिस निरीक्षक गायकवाड यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. तसे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी रात्री काढले. तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी म्हणून तात्पुरत्या स्वरूपात सहाय्यक पोलिस निरीक्षक अनंत अहिरे यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे.


