मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील पर्यटन मंत्री आणि शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई यांनी शिवसेनेच्या चिन्हावरून आणि मुख्यमंत्रीपदावरून सातत्याने भूमिका मांडणाऱ्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आज सडकून टीका केली. घटना आणि कायद्याने दिलेले अधिकार मान्य न करता “मी म्हणतोय तेच खरं,” असा पवित्रा घेणे योग्य नाही, तसेच माझ्या मनात मुख्यमंत्रीपदाचा कोणताची विचार नव्हता, या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर शंभुराज देसाई यांनी टीका केली. उद्धव ठाकरे हे फक्त आपल्यासोबतच्या सहकाऱ्यांना थोपवून धरण्यासाठीच अशी विधाने करत असल्याचे ते म्हणाले.
शंभुराज देसाई यांनी आज साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे अडीच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहे. राज्य हे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेवर आणि संविधानावर चालते. संविधानाने आणि घटनेने काही यंत्रणांना घटनेने निर्माण केलेले अधिकार बहाल केलेले आहेत. पक्षाच्या आणि पक्षाच्या चिन्हांसंदर्भातला निर्णय घेण्याचे अधिकार संविधानाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेले आहे. शिवसेना पक्षाचा आणि धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय घटनेने दिलेल्या अधिकाऱ्याच्या चौकटीत दिलेला आहे. काही लोकांनी त्याविरोधात न्यायालयात जाण्याचा प्रयत्न केला. पण न्यायालयाने सुद्धा त्यामध्ये हस्तक्षेप केला नाही. असे असताना ते मान्य करायचे नाही आणि मी म्हणतोय तेच खरे असे कुणी म्हणत असेल, तर ते योग्य नाही.
उद्धव ठाकरे हे सातत्याने चिन्ह आणि मुख्यमंत्रीपदाबाबत बोलत आहेत, यामागचे कारण सांगताना देसाई म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेल्या सहकाऱ्यांना आधार देण्यासाठी, तसेच त्यांच्यातील काही मंडळी विचलित होऊन एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात येऊ नयेत, यासाठी त्याला थोपवण्यासाठी केलेले हे वक्तव्य आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतरच्या राजकीय घडामोडींवरून देसाईंनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. “माझ्या स्वप्नात मुख्यमंत्रीपदाचा विचार नव्हता,” या उद्धव ठाकरे यांच्या विधानावर आक्षेप घेत देसाई म्हणाले, स्वप्नात वाटले नव्हते असे उद्धव ठाकरे म्हणाले असतील, मात्र, आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. 2019 मध्ये भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळाल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आमच्याकडे बोट दाखवून, ‘मला तुमच्यातील मुख्यमंत्री करायचा’ असे म्हटले होते.
“तेव्हा ते असे बोलले आणि आठ दिवसांत असा काय बदल झाला की, स्वतः मुख्यमंत्रीपद घेतले? याचा अर्थ आता ते जरी म्हणत असले की माझ्या स्वप्नात नव्हते, तरी तेव्हा ‘तुमच्यासारख्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन’ असे आमच्यासमोर का म्हटले? नंतर स्वतः मुख्यमंत्री का झाले?” असा थेट सवाल देसाईंनी विचारला.
देसाई पुढे म्हणाले की, ज्यांच्या विरोधात आम्ही लढलो, त्यांच्यासोबत जाऊन उद्धव ठाकरेंनी सरकार बनवले हा विपर्यास आहे. निवडणूक एका बाजूने लढवायची आणि मुख्यमंत्री पद दुसऱ्या बाजूला जाऊन घ्यायचे. या संपूर्ण प्रकरणाचा विचार लोकांनी केला आहे, असे सांगत मुख्यमंत्री पदासाठीच महाविकास आघाडीची स्थापना उद्धव ठाकरेंना त्यांच्या जवळच्या लोकांनी करायाला लावली, असा गंभीर आरोप पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केला.



