जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या तरुणाचा भुसावळ कंडारी येथे किरकोळ वादातून धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना रविवार, ५ रोजी रात्री १० ते ११ वाजेच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र राजेंद्र साळुंखे -कोळी (४०, रा. गेंदालाल मिल, जळगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो जळगावात पत्नी, तीन मुलांसह राहत होता. हातमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. जळगावच्या माजी महापौरांचा मुलगा व इतर दोघांसोबत जितेंद्र हा भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे एका कामानिमित्त गेला होता. तिथे एका हॉटेलवर मद्यपान केल्यानंतर चौघांमध्ये वाद सुरू झाले. वादातून हाणामारी झाली.
यानंतर जितेंद्र याला इतर तिघांनी धारदार शस्त्राने वार करून जागीच संपवले. जितेंद्रला खासगी रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी व रुग्णालयात पोहचले. जितेंद्र यांचा मृतदेह सरकारी रुग्णालयात हलवण्यात आला आहे. याबाबत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, पोलिस निरीक्षक राहुल वाघ, पीएसआय इकबाल सय्यद यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेची टीम पोहोचली होती. तसेच संशयितांचा माग काढण्याचे काम सुरू होते.


