पाचोरा : प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीस फूस लावून कारमधून पळवून नेत तिच्यावर कारमध्येच अत्याचार केला व तिला चौकात सोडून दिले. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी विचारणा केली असता आरोपीने खुनाची धमकी दिल्यावरून पाचोरा पोलिसांत त्या नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी अकरावीसाठी येथील महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी ये-जा करीत होती. यातच गावातील एका युवकाशी सूत जुळले. त्या युवकाने दि. २९ रोजी सकाळी ११ वाजता पाचोरा शहरातील महाराणा चौकातून त्या मुलीस स्वतःच्या कारमध्ये बसवून जरंडी (ता. सोयगाव) भागात नेले व त्या ठिकाणी कारमध्येच मुलीवर अत्याचार केला. मुलगी घरी येण्यास उशीर होत असल्याने आई-वडिलांनी चौकशी सुरू केली. यावेळी पीडितेचे वडील महाराणा चौकात तपास करीत असताना त्या नराधमाने मुलीस चौकात सोडून दिले. यावेळी पीडितेच्या वडिलांनी त्यास विचारणा केली असता आरोपीने दमदाटीची भाषा करून खुनाची धमकी पीडितेच्या वडिलांना दिली.


