अमरावती : वृत्तसंस्था
राज्यातील अमरावतीच्या परतवाड्यात मुंबई, नागपूर आणि अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली. या कारवाईत ब्राह्मण सभा कॉलनी येथून 5 अज्ञात व्यक्तींना तर दुसऱ्या कारवाईत कश्यप पेट्रोल पंप परिसरातून 6 जणांना पकडण्यात आले. परंतु, तपसाअंती पकडण्यात आलेल्या सर्वांना सोडून देण्यात आले आहे. अशी माहिती अमरावती ग्रामीण पोलिसांनी पत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे पोलिसांची ही कारवाई फसली असल्याची चर्चा सुरू आहे.
मुंबई, नागपूर आणि अमरावती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी परतवाडा शहरात संयुक्त कारवाई करत 13 जणांना ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान, ताब्यात घेतलेल्यांमध्ये आंतरराष्ट्रीय बिश्नोई गँगशी संबंधित एक आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. संशयितांना ताब्यात घेण्याच्या उद्देशाने आणि त्यांच्याकडे शस्त्रे असण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी वार्निंग शॉट फायर करत हवेत गोळीबार देखील केला, ज्यामुळे संपूर्ण परतवाडा शहरात मोठी खळबळ उडाली होती.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या 13 जणांची काल (3 ऑक्टोबर) दिवसभर परतवाडा पोलिस ठाण्यात कसून चौकशी केली. या चौकशीनंतर सायंकाळी अमरावती ग्रामीण पोलिसांनी एक अधिकृत पत्रक काढले, ज्यामध्ये पोलिसांनी एक धक्कादायक कबुली दिली आहे. या पत्रकात नेमकी कोणती माहिती दिली गेली, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई पोलिसांना वाँटेड असलेल्या कुणाल राणा नावाच्या आरोपीचे लोकेशन परतवाडा असल्याची माहिती मिळाली आणि नागपूर, अमरावती पोलिसांनी कारवाई केली. मात्र सखोल चौकशीनंतर 13 मधला तो आरोपी कुणाल राणा हा कुणाल राणा नाही ज्याचा शोध मुंबई पोलिस घेत होते. त्यामुळे ताब्यात घेण्यात आलेल्या इसमापैकी एक यांच्यात नाम साधर्म्य असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी सगळ्या संशयितांना सोडल्याची माहिती अमरावती ग्रामीण पोलिसांनी पत्रक काढून दिली.


