मुंबई : वृत्तसंस्था
पिंजरा’ या अजरामर मराठी चित्रपटातून घराघरांत पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि प्रसिद्ध नृत्यांगना संध्या शांताराम यांचे निधन झाले आहे. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
1972 साली प्रदर्शित झालेला व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘पिंजरा’ हा मराठी चित्रपटसृष्टीतील अमर कलाकृती मानली जाते. एका आदर्श शिक्षक आणि तमाशा कलावंत यांच्यातील प्रेम कथेवर आधारित या चित्रपटात संध्या यांनी साकारलेली तमाशातील नर्तिकेची भूमिका प्रचंड गाजली. या भूमिकेमुळे त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री बनल्या. आजही ‘पिंजरा’ आणि संध्या यांची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी त्यांच्या आयुष्यात तीन विवाह केले होते. संध्या या त्यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. दुसरी पत्नी, अभिनेत्री जयश्री यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर अवघ्या एका महिन्यातच शांताराम यांनी संध्या यांच्याशी विवाह केला होता. संध्या यांनी मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले असले, तरी त्यांच्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या. अभिनयासोबतच त्या एक कुशल नृत्यांगना म्हणूनही ओळखल्या जात होत्या.
शेलारांनी वाहिली श्रद्धांजली
आशिष शेलार यांनी ट्विट करुन याबाबत माहिती शेअर केली. त्यांनी लिहिले की, भावपूर्ण श्रद्धांजली ! ‘पिंजरा’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप पाडली. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आंखें बारह हाथ’ आणि विशेषत: ‘पिंजरा’ चित्रपटामधील त्यांची अजरामर भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिर शांती देवो !



