नवी दिल्ली: वृत्त संस्था
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानच्या अनेक लक्ष्यांवर अचूक हल्ले केले आणि त्यांची अमेरिकेत बनवलेली एफ-१६ आणि चिनी जेएफ-१७ यासह ८-१० पाकिस्तानी लढाऊ विमाने उद्ध्वस्त केली, असा खुलासा भारतीय हवाई दलाचे प्रमुख अमर प्रीत सिंह यांनी आज (दि. ३) केला. हा संघर्ष वेग आणि अचूकतेने उद्दिष्टे साध्य करणारा, तसेच पाकिस्तानला ‘गुडघे टेकायला लावणारा’ म्हणून इतिहासात लक्षात राहील, असेही ते म्हणाले.
९३व्या हवाई दल दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूर स्पष्ट आदेशासह सुरू झाले आणि भारताने आपले उद्दिष्ट साध्य केल्यामुळे ते त्वरीत थांबवण्यात आले. हवाई दलाचे जनसंपर्क अधिकारी विंग कमांडर जयदीप सिंह यांनी यावेळी तपशीलवार सर्व माहिती दिली.
पाकिस्तानवरील भारताच्या कारवाईची माहिती देताना हवाई दल प्रमुख म्हणाले, “पाकिस्तानच्या नुकसानीबद्दल बोलायचं झाल्यास, आम्ही त्यांच्या मोठ्या संख्येने हवाई तळांवर आणि अनेक ठिकाणांवर हल्ले केले. या हल्ल्यांमुळे, कमीतकमी चार ठिकाणी रडार, दोन ठिकाणी कमांड अँड कंट्रोल सेंटर्स, दोन ठिकाणी धावपट्ट्यांचे नुकसान झाले आणि तीन वेगवेगळ्या स्टेशनवरील त्यांचे तीन हँगर (विमाने ठेवण्याची जागा) उध्वस्त झाले आहेत.”
ते पुढे म्हणाले, “आमच्याकडे एका सी-१३० वर्गाच्या विमानाचे आणि ४ ते ५ लढाऊ विमानांचे पुरावे आहेत. तसेच, एक सॅम प्रणाली उद्ध्वस्त करण्यात आली. ३०० किमी पेक्षा जास्त अंतरावरील लांब पल्ल्याच्या हल्ल्याचे देखील आमच्याकडे स्पष्ट पुरावे आहेत, ज्यात एक महत्त्वाचे विमान आणि एफ-१६ आणि चिनी जेएफ-१७ वर्गातील पाच उच्च-तंत्रज्ञानाची लढाऊ विमाने उद्ध्वस्त झाली.”
ऑपरेशन सिंदूर १९७१ नंतर पहिल्यांदाच अशा विनाशकारी ऑपरेशनचे आयोजन करण्यात आले. हवाई दलाने त्यांची अचूकता, अभेद्यता आणि अचूकता सिद्ध केली. सर्व सैन्याने – हवाई, जमीन आणि नौदल – एकत्रितपणे नियोजन केले आणि अंमलात आणल्याचे त्यांनी सांगितले.
सिंग म्हणाले की, भारताने नव्याने समाविष्ट केलेल्या लांब पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानच्या कारवाया थोपवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या चार दिवसांच्या संघर्षाबद्दलच्या पाकिस्तानच्या दाव्यांना त्यांनी “मजेशीर गोष्टी” असे म्हणून फेटाळून लावले. “त्यांना वाटत असेल की त्यांनी आमची १५ विमाने पाडली, तर त्यांना तसे वाटू द्या. त्यांना त्यांची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी काहीतरी दाखवावे लागते. मला त्याचे काही वाटत नाही,” असेही ते म्हणाले.


