बीड : वृत्तसंस्था
देशभरात आज दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असून आज बीडच्या नारायण गडावर मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात हजारो मराठा बांधवांनी हजेरी लावली. प्रकृती खराब असतानाही मनोज जरांगे यांनी या मेळाव्याला हजेरी लावली आहे. आपल्या भाषणात मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला आयुष्यभर लक्षात राहिल असा मंत्र दिला आहे. हा मंत्र काय आहे हे सविस्तर जाणून घेऊयात.
जरांगे पाटलांनी मराठ्यांना मंत्र देताना, ‘आम्ही डावं टाकून सर्वांच्या मुंडक्यावर पाय टाकला. हुशारीने चला. खाताना विचार करा. गरम की गार झालंय. समाज डुबेल असं वागू नका. आपण मुंबईत, अंतरवलीत जमतो मजा म्हणून नाही. तुम्ही सांगितेलला विचार जपून ठेवायचा. माझा विचार जपून ठेवायचा तरच मोठं होऊ. नाही तर नाही. मराठ्यांनी चतूर व्हायचं. बावचळल्यावानी करू नका. मराठ्यांनी यापुढे शासक बनायचं आणि प्रशासकही बनायचं. हा शब्द घेऊन जा’ असं म्हटलं आहे.
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, ‘मराठ्यांनी डोकं लावून हुशारीने शासक बना आणि प्रशासक बना. शासक बनला तर कुणाला मागायची गरज पडणार नाही. शेतात काम करता करता, व्यवसाय करता करता, नोकऱ्या करताना शासक बनायचं डोक्यात राहू द्या. तुमच्यावर दारिद्र्याचा आलेला गंज काढायचा असेल तर शासक बना. कुणी चहा पाजला, हातात हात दिला किंवा डोक्यावरून हात फिरवल्याने आपण मोठं होणार नाही. जातीच्या अडचणी दूर करायच्या असेल तर तुम्हाला शासक व्हावं लागेल. आणि प्रशासकही बनावं लागेल.’
मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, ‘हात जोडून प्रशासनासमोर उभं राहावं लागतं. दादा… त्याला प्रशासनापुढे हात जोडावं लागतं. राजकीय नेता असला तरी गुंड असला तरी राहावं लागतं. तुम्ही पीएसआय बनला तर त्याला प्रशासन म्हणायचं. कलेक्टर, एसपी, पीएसआय बनला तर कोणताही दादा तुमच्या हात जोडून उभा राहिल. कोणताही नेता तुमच्या समोर हात जोडून उभा राहील. समजून घ्या. कष्ट करा आणि पळा एवढंच करू नका. तहसीलदार, कलेक्टर एसपी, वकील, न्यायालय, इंजिनिअर, डॉक्टर झाल्यावर, मोठ्या पोस्टवर अधिकारी झाल्यावर तुमचा मुलगा मुलगी सीआयडीत गेल्यावर. प्रत्येक क्षेत्रात आपलं लेकरू गेलं तर या गरीबाला बसायला एखादा आधार होईल.’


