जळगाव प्रतिनिधी प्रविण पाटील : जिल्ह्यातील कानळदा येथील जिल्हा परिषद शाळेत बुधवार १५ जून रोजी सकाळी ८ वाजता विद्यार्थ्यांची बैलगाडीवरून गावातून मिरवणूक काढून औक्षण करत अनोख्या पध्दतीने प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांची प्रमुख उपस्थिती होती.
बुधवार १५ जून पासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत असून विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू झाल्या. कोरोनामुळे दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळा आज पूर्ण क्षमतेने पहिल्याप्रमाणेच सुरू झाल्याने विद्यार्थी आनंदाने भरावले होते. या अनुषंगाने कानळदा गावातील शाळेच्या अनोख्या पध्दतीने प्रवेशोत्सवा साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या परिसरात रांगोळी टाकून तसेच विद्यार्थ्यांना औक्षण करून फेटे बांधण्यात आले होते.
त्यानंतर त्यांची मान्यवरांचा उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात बैलगाडीवर बसवून विद्यार्थ्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. तसेच या मिरवणुकीत विद्यार्थिनीनी लेझीम खेळत आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, शालेय समितीचे सदस्य, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकतेर कर्मचारी आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.