मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. राज्याच्या इतरही भागात पावसाने थैमान घातल्याने अवघ्या महाराष्ट्राचा पोशिंदा बळीराजा संकटात सापडला आहे. मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची शेती जमीनदोस्त झाली आहे.
कालच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ओला दुष्काळच्या सवलती लागू करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळणार असून ओला दुष्काळ नाही तर दुष्काळच्या सर्व सवलती लागू करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. यामुळे शेतकरी सरकारने घोषित केलेल्या आर्थिक मदतीकडे डोळे लावून बसले आहेत. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. राज्यातील विविध भागांमधून पूरग्रस्त भागांतील नागरिकांना अन्नधान्य कपडे आदी गोष्टी दिल्या जात आहेत. पण राज ठाकरे यांनी अनोखी मदत करण्याचा निर्णय घेतला असून मदतीला सुरूवातही झाली आहे.
पूरग्रस्त शेतकऱ्यांना मनसे नवसंजीवनी देणार असून ही संकल्पना राज ठाकरेंनी सुचवल्याची माहिती आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक बी-बियाणे, खते व अवजारे मदत म्हणून देण्यात येणार आहेत. राज ठाकरे यांनी पक्षाच्यावतीने नुकसानग्रस्त गावांची पाहणी करून तेथील शेतकऱ्यांना मदत करण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती मिळत आहे. खरंतर शेतकऱ्यांची उभी पीकं पाण्यात वाहून गेल्याने तो कर्जबाजारी झाला आहे. यामुळे सरकारची मदत त्याला कमी पडणार असून पुन्हा कर्ज काढावे लागणे टाळण्यासाठी त्यांना शेतीसाठी लागणारे आवश्यक साहित्य मनसेकडून पुरवण्यात येणार आहे.


