धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील बाभळे बु. येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दि. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात संपन्न होणार आहे. या पवित्र सोहळ्याचे आयोजन सर्व ग्रामस्थ मंडळ, बाभळे खु. यांच्या वतीने करण्यात आले असून, संपूर्ण गावामध्ये आनंदाचे आणि आध्यात्मिकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर कीर्तनाचा कार्यक्रम दि.८ रोजी रात्री ८ वाजता तर महाप्रसाद दि.९ ऑक्टोबर रोजी दुपारी ११ वाजेपासून होणार आहे.
या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मूर्ती स्थापना, मूर्ती विसर्जन पूजन, प्राणप्रतिष्ठा पूजा, मंदिर शिखर पूजन, ग्रामप्रदक्षिणा यांसारखे विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत. या सर्व विधींचे धार्मिक परंपरेनुसार आणि मंत्रोच्चारांसह आयोजन केले जाणार आहे. तसेच या सोहळ्याच्या निमित्ताने कीर्तन, गजनृत्य, भजन, आणि महाप्रसाद यांचेही आयोजन करण्यात आले आहे. कीर्तनाचे विशेष सत्र ह.भ.प. शुभम महाराज, मंठाळेकर यांच्या सुस्वर आणि प्रभावी वाणीने रंगणार आहे.
यांची राहणार उपस्थिती
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील, धानोरे येथील माजी सरपंच भगवान महाजन, धरणगाव नगरपालिकेचे गटनेता विनय भावे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, नगरपालिका नगरसेवक विलास महाजन, वाल्मीक पाटील यांच्यासह परिसरातील राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांची उपस्थिती राहणार आहे.


