पंचनामे होतील अशी स्थिती नाही ; मंत्री गिरीश महाजन !
दिवाळीपूर्वी नुकसानीचा आढावा घेऊन भरपाई देण्याची ग्वाही दिली आहे. पण राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यात लगेच पंचनामे होतील अशी स्थिती नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांतील शेतातील पुराचे पाणी अद्याप हटले नाही. त्यामुळे तिथे लगेच पंचनामे होतील अशी स्थिती नाही, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे पीडित शेतकऱ्यांना तातडीने मिळणाऱ्या नुकसानभरपाईवर सवाल उपस्थित होत आहे.
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आहे. या बैठकीपूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना गिरीश महाजन म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी अद्यापही पाणी आहे. शेतातही पाणी आहे. त्यामुळे आता लगेच पंचनामे होतील अशी स्थिती नाही. जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी, पोलिस व कृषि विभाग या प्रकरणी 24 तास काम करत होते. हे अधिकारी रात्रंदिवस रस्त्यावर होते. पण आजपासून थोडे विश्रांती मिळाली आहे. तरीही ते सकाळपासूनच कामाला लागले आहे. पंचनामे झाल्याशिवाय नुकसानीचा आढावा घेता येत नाही. नेमका आकडा कळत नाही. पण निश्चित आत्ता हे आकडे येतील. त्यानंतर किती नुकसान झालंय, किती शेतकऱ्यांना द्यायचे आहे. तो आकडा पाहून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री केंद्राकडे राज्याचा मदतीचा प्रस्ताव पाठवतील.
गिरीश महाजन यांनी यावेळी मुस्लिम समाजाला एकजुटीने पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांचा हटवण्याचे आवाहन करणाऱ्या एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावरही निशाणा साधला. महाजन यांनी त्यांच्या या आवाहनाची खिल्ली उडवत त्यांनी कितीही आवाहने केली लोकांचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याचवरच असल्याचे स्पष्ट केले. तसेच त्यांच्या आवाहनामुळे काहीही फरक पडणार नसल्याचा दावाही केला.
पीकविम्याच्या मुद्यावर बोलताना महाजन म्हणाले, पीक विम्याच्या बाबतीत राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल. पीक विमा चालूच आहे. पण काही सुधारित योजना आणता येईल काय? शेतकऱ्यांना त्यातून काही कायमस्वरुपी दिलासा मिळणार आहे का? हा विषय मंत्रिमंडळाचा आहे. मुख्यमंत्री यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतील.


