जळगाव : प्रतिनिधी
काम आटोपून माघारी परतण्याकरीता बस स्थानकावर आलेल्या कल्पना सुनिल लखोटे (वय ५९, रा. माळी गल्ली जामनेर) यांच्या गळ्यातून ६० हजार रुपये किंमतीची सोनसाळखी चोरट्याने चोरुन नेली. ही घटना दि. २४ रोजी सायंकाळच्या सुमारास नवीन बसस्थानकात घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जामनेर येथील कल्पना सुनील लखोटे (वय ५९) या आपल्या कामासाठी जळगाव शहरात आल्या होत्या. त्यांचे खासगी काम संपल्यानंतर त्या दि. २४ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजता जामनेरला जाण्यासाठी नवीन बसस्थानकावर आल्या होत्या. त्याच वेळी, गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोन्याची सोनसाखळी तोडून पळ काढला. गळ्यातील साखळी चोरीला गेल्याचे लक्षात येताच लखोटे यांनी परिसरात मोठा शोध घेतला, परंतु चोरट्याचा किंवा साखळीचा कोणताही सुगावा लागला नाही. या घटनेनंतर चार दिवसांनी, लखोटे यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानुसार, रविवाररात्री १० वाजता अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक राजेश पदमर करत आहेत. शहरातील बसस्थानक परिसरात दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेमुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे


