पाचोरा : प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे भागातील शहरातील कृष्णापुरी टेकडी गल्लीत धाब्याचे घर कोसळल्याने एक १२ वर्षाच्या बालकाचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला तर, दुसरा एक बालक जखमी झाला आहे. मयत बालकाच्या वडिलांचे यापुर्वीच निधन झाले असून तो एकुलता एक असल्याने आईचा वृध्दपकाळातील सहारा हरपल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टेकडीगल्लीत विठ्ठल काशिनाथ पाटील हे आपल्या मुला सोबत धाब्याच्या घरात राहत असून त्यांच्याकडे चाळीसगाव तालुक्यातील लोंढे येथे राहणाऱ्या दिपाली नितिन राणे हिचा एकुलता एक मुलगा महेश नितिन राणे (वय १२) हा राहत होता. सोमवारी दुपारी महेश नितिन राणे व त्याचा मावसभाऊ योगेश बाळू पाटील हे दुपारी घरातील मागच्या बाजूस झोपले होते. यावेळी घरातील सर्व सदस्य घराच्या पुढील भागात बसलेले होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक घराचा मागिल भाग अचानक कोसळल्याने छताची माती दोन्ही मुलांच्या अंगावर पडल्याने ते ढिगाऱ्या खाली दबले गेले. विठ्ठल पाटील व चंद्रकांत पाटील यांनी तातडीने गल्लीतील नागरीकांना बोलावून मुलांच्या अंगावर पडलेली मातीव लाकडे बाजुला केली व महेश राणे, योगेश पाटील यांना बाहेर काढण्यात आले. त्यांना तत्काळ ग्रामिण रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असता महेश राणे मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले तर, जखमी झालेल्या योगेश पाटील याच्यावर उपचार सुरु करण्यात आले.
गेल्या २० दिवसांपासून तालुक्यात अतिवृष्टी सुरू असल्याने पावसाचे पाणी भिंतीमध्ये झिरपल्याने धाब्याचे घर पडले असेल असा प्राथमिक अंदाज लावला जात असून घटनास्थळी नगरपालिका मुख्याधिकारी मंगेश देवरे, तहसिलदार विजय बनसोडे, तलाठी श्रीमती चौधरी, पोलीस निरिक्षक राहूल पवार, सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निकम, माजी नगरसेवक विकास पाटील, किशोर बारवकर, अनिल येवले, भोला पाटील यासह परिसरातील नागरीकांनी भेट देत कुटुंबाचे सांत्वन केले.
मयत महेश नितिन राणे याच्या वडिलांचे निधन झाले असून आई दोन मुलींसह चाळीसगाव तालुक्यातील लोंढे येथे राहत होती. मुलाला शिक्षणासाठी वडिल व भावाकडे राहण्यास पाठवले होते. चांगले शिक्षण घेवून मुलगा नोकरीला लागेल व आपल्या वृध्दपकाळात महेश आईची काठी बनेल, अशी आशा आईच्या मनात होती. परंतु नियतीला हे मान्य नव्हते, नियतीने सोमवारी महेशवर काळाचा घाला घातला आणि विधवा आईपासून महेशला हिरावून नेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.


