अहिल्यानगर : वृत्तसंस्था
राज्यातील अहिल्यानगर येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. अहिल्यानगर इथं पोलिसांनी रास्ता रोको करणाऱ्या एका समाजावर लाठी चार्ज केला आहे. अहिल्यानगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर मुस्लिम समाजाचे आंदोलन सुरू होतं. त्यांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. त्याबाबत रास्ता रोको करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठी चार्ज केला. दरम्यान अहिल्यानगरमध्ये तणापूर्ण शांतता आहे. याबाबत पोलिसांनी देखील शांतता राखा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केलं आहे.
रस्त्यावर लिहिलेल्या आक्षेपार्ह मजकुरावरून दोन गटांत तणाव निर्माण झाला. हा मजकूर मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखवणारा आणि त्यांचा अवमान करणारा होता. या घटनेमुळे मुस्लिम समाज आक्रमक झाला होता. त्यांनी तत्काळ कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गर्दी केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, एका संशयित आरोपीला ताब्यात देखील घेतले आहे. मात्र, सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, या मागणीसाठी मुस्लिम समाजाच्या एका गटाने नगर-संभाजी महामार्गावर सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन सुरू केले.
पोलिसांनी सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याचे वारंवार आश्वासन दिले. तरीही, जोपर्यंत आरोपी अटक होत नाहीत, तोपर्यंत रास्ता रोको सोडणार नाही, अशी आक्रमक भूमिका या गटाने घेतली. जेव्हा हा जमाव शहराच्या दिशेने निघाला, तेव्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, या भीतीमुळे पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. आक्रमक झालेल्या या गटाची आणि पोलिसांची बाचाबाची झाली आणि त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांनी लाठीचार्ज करून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला.
सध्या अहिल्यानगरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. अहिल्यानगर पोलिसांच्या वतीने समस्त जनतेला आणि मुस्लिम बांधवांना आवाहन करण्यात आले आहे की, कुठल्याही अफवा किंवा गैरसमजांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, जेणेकरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. नवरात्र उत्सव चालू असल्याने सर्वांनी शांतता बाळगावी, असेही आव्हान देण्यात आले आहे


