जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरात ऑनलाईन फसवणुकीसाठी बोगस कॉल सेंटर चालवणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या विशेष पथकाने पर्दाफाश केला आहे. ममुराबाद रोडवरील एल के. फॉर्म येथे चालणाऱ्या या गोरखधंद्यावर धाड टाकून पोलिसांनी कॉल सेंटरच्या मालकासह एकूण आठ जणांना ताब्यात घेतले आहे. या माजी महापौर ललीत कोल्हे यांचा समावेश आहे.
अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांना शनिवारी (२७ सप्टेंबर) या अवैध कॉल सेंटरबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीची शहानिशा होताच त्यांनी कोणतीही वेळ न दवडता, रविवार, २८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास एल के. फॉर्मवर छापा टाकला.
३१ लॅपटॉपसह संपूर्ण सेटअप जप्त
पोलिसांनी धाड टाकली असता, या ठिकाणी ३१ लॅपटॉप, हेडफोन आणि संपूर्ण कॉल सेंटरचा सेट-अप आढळून आला. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत हा ‘हायटेक’ गोरखधंदा विदेशी नागरिकांना लक्ष्य करत असल्याचे स्पष्ट झाले.
कॉल सेंटरमधील कर्मचारी स्वतःला ‘अधिकृत एजंट’ असल्याचे भासवत होते. डेटा चेक करण्याच्या बहाण्याने किंवा इतर आकर्षक आमिषे दाखवून हे आरोपी परदेशी नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करत असल्याचे उघड झाले आहे. ही टोळी आंतरराष्ट्रीय स्तरावर फसवणुकीचे मोठे रॅकेट चालवत होती, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
राज्याबाहेरील आरोपी ताब्यात
या छाप्यात पोलिसांनी फॉर्मचा लोकल मालक माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह सध्या कार्यरत असलेल्या आठ जणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, या कॉल सेंटरमध्ये एकूण २० ते २५ जण काम करत होते. अटक झालेले बहुतांश आरोपी राज्याबाहेरील रहिवासी असल्याने या टोळीचे जाळे आंतरराज्यीय स्तरावर पसरलेले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाची पोलीस आता कायदेशीर चौकशी करत आहेत. कॉल सेंटरमधून जप्त केलेला डेटा आणि उपकरणे यांची कसून तपासणी करून या फसवणूक रॅकेटचे जाळे किती मोठे आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या या धडक कारवाईमुळे जळगावात चालणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीच्या मोठ्या टोळीचा भांडाफोड झाला असून, यापुढेही अशा अवैध धंद्यांवर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.


