सोलापूर : वृत्तसंस्था
“मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा” या कुसुमाग्रजांच्या ओळींची सजीव प्रतिमा सध्या सीना नदीच्या काठावर दिसून येते आहे. महापुराच्या तडाख्याने घरे-दारे, शेतं-शिवार वाहून गेली; पण संयम, जिद्द आणि संघर्षाची मशाल घेऊन ब्रह्मदेवनगरमधील कुटुंबे आजही जगण्यासाठी झगडत आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, उमदी तालुक्यातील कोर्सेगाव परिसरातील ब्रह्मदेवनगरमधील सुमारे 20 कुटुंबे सध्या घराच्या छपराऐवजी ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये आश्रय घेऊन राहतात. दैनंदिन जीवनासाठी लागणारी मूलभूत साधनेदेखील हरवलेली असताना, संततधार पाऊस, अंगात घुसणारी थंडी आणि नदीच्या खवळलेल्या लाटा यांचा सामना करत, ही कुटुंबे उघड्यावर जीवन कंठत आहेत.
23 सप्टेंबर रोजी आलेल्या महापुरात गावात पाणी इतक्या वेगाने घुसले की लोकांना घरातील साहित्य उचलण्याचीही संधी मिळाली नाही. शेतांतील उभी पिकं, घरातील अन्नधान्य, कपडे-लत्ते, अंथरुण-पांघरुण सर्व काही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. जनावरे आणि लहान मुलांना घेऊन या कुटुंबांनी मिळेल त्या मार्गाने गावाबाहेर उंच भाग गाठला. मात्र, गावातील घरं पाण्याखाली गेलेली आणि रस्ते बंद झाल्याने दुसरीकडे आश्रय घेण्याचा मार्गही बंद झाला. अनेकांनी ट्रॅक्टर ट्रॉलींना प्लास्टिकच्या ताडपत्रीने झाकून तात्पुरते निवारे तयार केले आहेत. काहींनी जमेल तसा तंबू उभा केला आहे. या तात्पुरत्या घरांमध्ये पावसाचे पाणी थेट अंगावर पडते, रात्री थंडीने लहान मुलं कुडकुडतात, उबदार कपड्यांचा, चादरींचा, ब्लँकेटचा पूर्णतः अभाव आहे. “हे देवा, इतकी सत्त्वपरीक्षा घेऊ नको…” अशी आर्त हाक या आपद्ग्रस्तांच्या मनातून वारंवार निघते. सीना नदी मातेच्या कोपामुळे उध्वस्त झालेला संसार आणि आता तग धरून उभा असलेला माणूस, या दोहोंचा संघर्ष सध्या ब्रह्मदेवनगरात सर्वत्र दिसून येतो.
संबंधित प्रशासनाने मदतीचा हात दिला असला तरी तो अद्यापही अपुरा असल्याची तक्रार गावकऱ्यांची आहे. या भागातील अल्पभूधारक व बागायतदार शेतकरी तसेच मजूरवर्ग आज मूलभूत गरजांसाठीही हतबल झाला आहे. आपत्ती निवारण यंत्रणांनी तातडीने ठोस मदत करावी, अशी मागणी आता गावकऱ्यांकडून होत आहे.


