नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील तामिळनाडू येथे अभिनेता आणि राजकारणी थलपथी विजय याच्या शनिवारी संध्याकाळी करूर येथे झालेल्या सभेत चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये किमान ३८ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्याची परिस्थिती पाहता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. दरम्यान, ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली? याचे कारण समोर आले आहे.
चेंगराचेंगरीची घटना नेमकी कशामुळे घडली?
अभिनेता विजय रॅलीसाठी दुपारी १२ वाजता पोहोचणार होता, परंतु त्याला तब्बल सहा तास उशीर झाला. यादरम्यान गर्दी हळूहळू वाढत गेली आणि विजय रॅलीला संबोधित करत असताना गर्दी अनियंत्रित झाली आणि चेंगराचेंगरीला सुरुवात झाली. मोठ्या संख्येने लोक उपस्थित असल्याने उष्णता वाढली. अनेक जण बेशुद्ध पडू लागले, त्यानंतर विजयने भाषण थांबवले आणि त्याच्या प्रचाराच्या बसमधून लोकांच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या फेकल्या. तेव्हा लोकांनी पाण्याची बाटली घेण्यास बसकडे धाव घेतली. ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि अनेक लोक त्यात जखमी झाले. प्रचंड गर्दीमुळे रुग्णवाहिका देखील रुग्णालयात पोहोचण्यास अडचणी आल्या. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.
याशिवाय काही मीडिया रिपोर्टनुसार असेही म्हंटले जात आहे की, गर्दीत नऊ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्यानंतर रॅलीत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अनेक लोक अचानक ती मुलगी शेवटची ज्या ठिकाणी दिसली होती, त्या दिशेने तिचा शोध घ्यायला जाऊ लागले. यावेळी अचानक मोठी गर्दी एका दिशेने पुढे सरकली आणि चेंगराचेंगरीची घटना घडली. तसेच प्रशासनाला ३०,००० लोकांची उपस्थिती अपेक्षित होती, परंतु ६०,००० हून अधिक म्हणजेच दुप्पट संख्येने लोक आल्याने गर्दी हाताळण्यासाठी व्यवस्था कमी पडली.
दरम्यान, मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आणि पीडितांना युद्धपातळीवर मदत पुरवण्याचे आदेश दिले. त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने मदत आणि उपचार सुनिश्चित करण्याचे आदेश दिले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चेंगराचेंगरीच्या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.
एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, “तामिळनाडूतील करूर येथे एका राजकीय रॅलीदरम्यान घडलेली दुर्दैवी घटना अत्यंत दुःखद आहे. ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. या कठीण काळात त्यांना ताकद मिळो अशी प्रार्थना. जखमी पीडित लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो.”
दरम्यान, या दुर्घटनेनंतर तामिळनाडू सरकारने अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सार्वजनिक मदत निधीतून प्रत्येकी १० लाख रुपये आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांना प्रत्येकी १ लाख रुपये देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. विजय तमिळ चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय चेहरा आहे. आता त्याने राजकारणात प्रवेश केला आहे. विजयने ‘तमिझगा वेत्री कळगम’ नावाच्या पक्षाची स्थापना केली आहे. तामिळनाडूत होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्याने जोरदार तयारी सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून त्याने एक सभा आयोजित केली होती. परंतु याच दरम्यान गर्दी अनियंत्रित झाल्याने चेंगराचेंगरी झाली.


