छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
राज्यातील ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहिल्यानगरमधील पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर येथे ओबीसी समाजासाठी आयोजित मेळाव्यासाठी ते आले होते. ते अहिल्यानगरच्या दिशेने रवाना झाले, मात्र त्यापूर्वी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. यावर आता मराठा समाजाचे प्रणेते मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, प्रसिद्धीसाठी स्वतःच्या गाडीवर हल्ले करून घेतात, असा शब्दांत जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे. स्टंटबाज लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, ते प्रसिद्धीसाठी गाड्यावर हल्ले करून घेतात. या जातीवाद करणाऱ्या लोकांकडे लक्ष द्यायचे नाही, सगळं प्रसिद्धीसाठी सुरु आहे. दगड मारून घेतात, हल्ले करून घेतात, असा आरोप जरांगेंनी हाकेंवर केला आहे.
पुण्याहून लक्ष्मण हाके सभेसाठी पाथर्डी येथे चालले होते. तेव्हाच मध्येच रस्त्यावर हल्ला झाल्याच त्यांच्या सहकाऱ्याने सांगितले. हल्ला करणारे कोण होते याची माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. ओबीसी समाज्याच्या विविध मागण्यांसाठी लक्ष्मण हाके यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काल त्यांनी एक भावनिक फेसबुक पोस्ट केली होती. त्यानंतर आज त्यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात गाडीचे नुकसान झाले आहे. यामुळे या हल्ल्यामागे कोण आहे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.


